पुणे : मठात गांजा लागवड करणाऱ्यामहाराजाच्या मठावर शिरूर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ४१ किलो गांजा व सांबरशिंगे व कातडे जप्त केली आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
शांताराम बाबुराव ढोबळे उर्फ बापू महाराज (वय ५३, रा. हनुमान मंदिर मठ, काठापूर खू., ता. शिरूर) असे अटक केलेल्या महाराजाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काठापूर खुर्द येथे हनुमान मंदिर व परिसरात गांजा जवळ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शिरूर पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी मठ चालवणारा महाराज शांताराम ढोबळे यांच्या मठातून तयार १० किलो गांजा व परिसरात गांजाची झाडे असा एकूण ४१ किलो ४४५ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. पोलिसांनी अधिक तपासणी केली असता एका गोनीमध्ये लपवून ठेवलेले सांबर जातीच्या प्राण्याचे ३ शिंगे व कातडे मिळून आले. एकूण २ लाख ५७ हजार २२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून, आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सुरेश गिते, पोलिस नाईक नितीन सुद्रिक, निलकंठ कारखेले, नाथसाहेब जगताप, बाळू भवर यांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत हे करत आहेत.
गांजा लागवड करणाऱ्या महाराजाच्या मठावर शिरूर पोलिसांचा छापा
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२१ ११:०३:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: