पिंपरी : चिखली येथील लक्ष्मण देवासी या आठ वर्षांच्या मुलाचा खून करणार्याी आरोपीला गुंडविरोधी पथकाने 48 तासात जेरबंद केले असून त्याने खंडणीसाठी मृत मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती बुधवारी अपर पोलीस आयुक्तांनी पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. बपीलअहमद रईस लष्कर (वय 26, रा. गणेश मंदीरजवळ, हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली, पुणे. मूळ रा. काझीडहर, पोस्ट. नरसिंगपुर, जि. सिलचर, आसाम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मण बाबुराम देवासी (वय 8) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
16 एप्रिल रोजी चिखलीतील किराणा दुकानदार बाबुराम डुंगरराम देवासी यांचा मुलगा लक्ष्मण हा दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कोणास काहीएक न सांगता घरातून कोठेतरी निघून गेला. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तात्काळ लक्ष्मण याचा शोध सुरु केला.
त्याच दिवशी सायंकाळी बाबूराम देवासी याच्या घरापासून 200 मीटर अंतरावर निर्जन पत्र्याच्या शेडमध्ये लक्ष्मण हा मृतावस्थेत सापडला. हा खुनाचा गुन्हा असल्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाला सुरुवात केली.
गुंडविरोधी पथकाने गुन्हा घडल्यापासून घटनास्थळावरील एकूण 83 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करुन कौशल्याने तपास करत आरोपी बपीलअहमद रईस लष्कर याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. बाबूराम देवासी यांच्याकडून एक लाख रुपये खंडणी वसूल करण्यासाठी लक्ष्मण याचे अपहरण केले. त्याने आरडाओरड करू नये म्हणून दगड डोक्यात घालून त्याचा खून केला अशी कबुली आरिपीने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई गुंडविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे शाम बाबा, विजय तेलेवार, मयूर दळवी, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी व तौसीफ शेख यांनी केली आहे.
video : चिखली येथील त्या मुलाचा खून खंडणीसाठी; 48 तासात आरोपीस अटक! गुंडविरोधी पथकाची कामगिरी
Reviewed by ANN news network
on
४/२०/२०२२ ११:११:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: