पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत १४ पिस्तुले, आठ काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून ही शस्त्रे मध्यप्रदेशातून शहरात विक्रीसाठी आणण्यात आली होती. यातील एका आरोपीकडून पूर्वी २४ पिस्तुले आणि १६ काडतुसे जप्त करण्यात आली होती. या कारवाईमुळे शहरात बेकायदा शस्त्रे पुरविणा-या टोळ्या सक्रीय असल्याचे सिद्ध झाले आहे.
आकाश अनिल मिसाळ (वय २१, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय २६, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (वय २८, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा विरोधी पथकाने ३ जानेवारी रोजी रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्तुले, दोन काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले.
त्या गुन्ह्यात आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतूसे मिळाली. तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्तूुल विकले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सापळा लावून अजित गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण १४ पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे असा एकूण ४ लाख ९० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे दाखलेबाज गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून २४ पिस्तुले आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून शहरात विकणे सुरू केले होते.
रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे. ही कारवाई दरोडा विरोधी पथकाने केली आहे.--
मध्यप्रदेशातून आणलेला मोठा शस्त्रसाठा जप्त : पिंपरी चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Reviewed by ANN news network
on
१/१९/२०२२ ०९:१५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: