पिंपरी : पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याशी चांगली ओळख असून जमिनीची प्रकरणे आम्ही सोडवतो असे सांगत फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्याी एका टोळीला जेरबंद करण्यासाठी आखलेल्या मोहिमेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: भाग घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मात्र, दोन आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाले. त्यांचा तपास सुरू आहे.
भक्तीशक्ती चौक, निगडी येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. विन्सेंट अलेक्झांडर जोसेफ (वय 52, ताम्हाणे वस्ती, मोरे वस्ती, चिखली) यांनी याबाबत देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.रोशन संतोष बागुल (वय 22), गायत्री रोशन बागुल (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव दिंडोरी, नाशिक) आणि पुजा विलास माने (वय 22, रा. देव इंद्रायणी सोसायटी देहुगाव, मुळगाव हडपसर, पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत. तर, ज्ञानेश्वर (पूर्ण नाव माहिती नाही) आणि अजित हाके (रा. त्रिवेणीनगर) हे दोन आरोपी फरार आहेत.
आरोपी विन्सेंट जोसेफ यांच्या खोलीत भाड्याने रहायला होते. आरोपी रोशन सायबर क्राईमचा माणूस असल्याचे भासवत होता. त्याने महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे बनावट ओळखपत्र तयार केले होते. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून ‘आम्ही जमिनीची प्रकरणे सोडवतो, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत चांगली ओळख आहे,’ अशी बतावणी करत फिर्यादी यांचे जमिनीचे प्रकरण सोडवून देतो पण त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगितले. फिर्यादीने ही सर्व माहिती पोलिसांना दिली.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी स्वत: या कारवाईत सहभागी होत वेशांतर केले आणि फिर्यादी यांनी आरोपींना पैसे घेण्यासाठी पुना गेट, भक्ती शक्ती चौक येथे बोलवले. पोलीस आयुक्त आणि आरोपी जवळच बसले होते, आरोपीने आयुक्तांना ओळखले नाही. पैसे स्विकारल्यानंतर आयुक्तांनी आरोपीला पकडले. यासह दोन महिला आरोपींना देखील अटक केली आहे. तर, दोन आरोपी घटनास्थळावरून फरार आहेत.
आरोपीला देण्यासाठी पोलिसांनी नकली नोटांचे बंडल तयार केले होते, ते आरोपीच्या खिशातून बाहेर काढण्यात आले. आरोपी जवळ सायबर क्राईम, महाराष्ट्र पोलीस हेल्पर असे लिहलेले बनावट ओळखपत्र सापडले आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेशांतर करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
Reviewed by ANN news network
on
३/२९/२०२२ १२:३४:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: