पिंपरी: महाळुंगे पोलिसांनी दुचाकी चोरणार्या दोन अट्टल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडूनपाच दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची एकूण किंमत 2 लाख 15 हजार आहे. या कारवाईमुळे महाळुंगे पोलीस चौकीतील तीन, चाकण आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक वाहन असे पाच वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अक्षय प्रभाकर कणसे (वय 24, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. लातूर), योगेश मोहन सूर्यवंशी (वय 26, रा. कुरुळी, ता. खेड. मूळ रा. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
महाळुंग येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग हे त्यांच्या पथकासह गस्त घालत असताना दोन तरुण दुचाकीवरून येताना दिसले. दुचाकीला समोरील नंबर प्लेट नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला मात्र ते न थांबता पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ती दुचाकी गायकवाड वस्ती कुरुळी येथून 10 मार्च रोजी चोरल्याची कबुली दिली. त्यांनतर त्यांना अटक करून आणखी चौकशी केली असता त्यांनी आणखी चार दुचाकी चोरल्याचे सांगितले. या दोघांच्या ताब्यातून 2 लाख 15 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
या कारवाईमुळे एकूण पाच दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दशरथ वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक किरण शिंदे, पोलीस हवालदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, गोरख गाडीलकर, अशोक जायभाये, पोलीस नाईक संतोष काळे, युवराज बिराजदार, किशोर सांगळे, अजय गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे यांनी केली.
दोन दुचाकीचोर महाळुंगे पोलिसांच्या जाळ्यात; पाच दुचाकी जप्त
Reviewed by ANN news network
on
४/१७/२०२२ ०२:३८:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: