अपहरण झालेल्या आदित्यचा खंडणीसाठी खून
पिंपरी : पिंपरीतील मासुळकर कॉलनी येथील आदित्य गजानन ओगले या मुलाचा खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणी ओेगले परिवार रहात असलेल्या सोसायटीतील एका तरुणासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. २४ तासात या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुरुवारी सायंकाळी खेळायला बाहेर गेलेला आदित्य बेपत्ता झाल्यामुळे त्याचे वडील गजानन श्रीकांत ओगले (वय-४९ रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी मंथन किरण भोसले (रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे (रा. घरकुल, निगडी) यांना अटक केली आहे.
मयत आदित्य याचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणी मागितली होती. त्यामुळे आरोपींनी आदित्याचा पैशासाठी खून केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. परंतु पोलिसांनी यामध्ये वेगळाच संशय व्यक्त केला आहे. कारण आरोपी आणि ओगले हे एकाच सोसायटीत राहत होते. त्यामुळे त्यांच्यात काही वाद होते याचा तपास पोलीस करीत आहेत.
या प्रकरणी तांत्रिक तपास करुन गुंडविरोधी पथकाने सोसायटीत राहणाèया आरोपी मंथन याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेवटी सखोल चौकशीनंतर मंथन याने साथीदार अनिकेत याच्या मदतीने आदित्यचा गळा दाबून खून करुन मृतदेह भोसरी एमआयडीसी येथील एका कंपनीच्या पडक्या इमारतीच्या टेरेसवर फेकल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आदित्यचा मृतदेह ताब्यात घेतला.
अपहरण झालेल्या आदित्यचा खंडणीसाठी खून
Reviewed by ANN news network
on
९/१०/२०२२ १०:३९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: