पिंपरी : पिंपरीतील भाटनगर परिसरात २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी गांजा विकत घेण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून एका गांजेकसाने तरुणावर शस्त्रक्रिया करण्याच्या पात्याने वार केले. सागर अशोक पवार (वय २५, रा. पत्राशेड लींक रोड, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. २७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश भाऊसाहेब कांबळे (वय २०) आणि कमलेश भाऊसाहेब कांबळे (वय २५ दोघेही रा. पत्राशेड, लींक रोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा सात वाजताच्या सुमारास भाटनगर, पिंपरी येथे आरोपी रुपेश कांबळे याने फिर्यादी अशोक पवार यांना रस्त्यात थांबवले. गांजा पिण्यासाठी रुपेश याने पैशाची मागणी केली. मात्र सागर यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपी रुपेश याने फिर्यादी सागर यांना शिवीगाळ केली. त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा आरोपी रुपेश हा कमलेश याच्या सोबत आला. त्या दोघांनी पुन्हा फिर्यादी सागर यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. आरोपी रुपेश याने कपड्यातून सर्जिकल ब्लेड काढून फिर्यादी सागर यांच्या कपाळावर मध्यभागी, डाव्या गालावर, कानाजवळ डाव्या कानाच्या खाली, मानेवर मारून गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
गांजा खरेदीसाठी पैसे न दिल्याने तरुणावर वार
Reviewed by ANN news network
on
११/२८/२०२१ ०८:५०:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: