Police e news

दागिने पळविणारी इराणी टोळी जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी

वाकड : आम्ही पोलीस आहोत. पुढे गुन्हा घडला आहे. तुमचे दागिने काढून पिशवीत सुरक्षित ठेवा असे सांगून हातचलाखीने नागरिकांचे दागिने लांबविणा-या इराणी टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीला ठाणे जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख २२ हजार रुपये किमतीचे १२५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी, मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. हैदर तहजिब सय्यद (वय ५५), युनुस साबुर सय्यद (वय ४६, दोघे रा. पाटील नगर, आंबिवली पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे), गाझी रफिक जाफरी (वय ३५, रा. आंबिवली, इंदिरा नगर, मंगलनगर झोपडपट्टी, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा चौथा साथीदार हैदर ऊर्फ लंगडा पप्पू सय्यद ऊर्फ इराणी (वय ३५, रा. आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) याचा पोलीस शोध घेत आहेत. लक्ष्मण देशमुख (वय ६४, रा. द्वारकानगर, नागपूर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास कोकणे चौक रहाटणी येथील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई खरेदी करून देशमुख घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. त्यातील दोघांनी देशमुख यांना ते पोलीस असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला. देशमुख यांचे दागिने सुरक्षित पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखीने ते काढून घेतले. त्यानंतर तिस-या अनोळखी व्यक्तीने देशमुख यांचे लक्ष इतरत्र वेधून तिघांनी देशमुख यांचे दोन लाख वीस हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोन्याचे दागिने पळवून नेले. या प्रकारचे आणखी तीन गुन्हे वाकड पोलीस ठाण्यात दाखल होते. या गुन्ह्यांचा वाकड पोलीस तपास करीत होते. त्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली. सीसीटीव्ही आणि गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून हे आरोपी इराणी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सुरुवातीला पाटील इस्टेट आणि लोणी काळभोर येथील इराणी वस्तीत जाऊन वाकड पोलिसांनी चौकशी केली. मात्र आरोपी तिथले नसून ठाण्यातील आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान एका सीसीटीव्ही मध्ये आरोपी मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसले. संभाव्य आरोपींपैकी हैदर सय्यद हा सराईत गुन्हेगार असून सर्व आरोपी आंबिवली इराणी वस्तीत राहणारे आहेत. हे गुन्हेगार त्यांच्या वस्तीत आलेल्या पोलिसांना जमावाने घेरत असल्याचा इतिहास असून त्या वस्तीतील महिला पोलीस पथकाला कोणत्याही पुरुष आरोपीस वस्तीतून बाहेर घेऊन जात असताना प्रतिकार करत असल्यामुळे आरोपींना अटक करणे पोलिसांसमोर आव्हान होते. वाकड पोलिसांची दोन पथके ठाण्याला पोहोचली. त्यानंतर स्थानिक पोलीस खडकपाडा पोलीस ठाण्यातील माहितगार अंमलदारांना घेऊन आंबिवली परिसरात जाऊन आरोपींचा शोध घेतला. मात्र सुरुवातीला पोलिसांना अपयश आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला. बनेली येथील एका हॉटेलच्या पाठीमागे आरोपी बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वाकड पोलिसांच्या दोन्ही पथकांनी छापा मारून दोघांना पकडले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच एकजण पळून गेला आणि दलदलीच्या गवताळ भागात लपला. पोलिसांनी त्याला दलदलीच्या गवताळ भागातून शोधून काढले आणि अटक केली. त्यांच्या चौथ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
दागिने पळविणारी इराणी टोळी जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी दागिने पळविणारी इराणी टोळी जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी Reviewed by ANN news network on १/१३/२०२२ ०८:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.