हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक
वाकड : कर्ज मंजूर करून देण्याच्या बहाण्याने काळेवाडी फाटा येथील एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच लाख रुपयांना फसविण्यात आले आहे. हा प्रकार मे ते 20 सप्टेंबर 2022 या काळात घडला.
या प्रकरणी अमोल माणिकराव पाचपुते (वय 41, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, अहमदनगर) याने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बालाजी बळीराम घोडके (वय 32), संग्राम यादव (वय 45), मुजावर फायनान्सचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीला हॉटेलचे नूतनीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादीकडून 2 लाख 45 हजार रुपये घेतले.पैसे घेऊनही कर्ज मंजूर करून दिले नाही. फिर्यादीने याबाबत विचारणा केली असता आरोपींनी त्याला धमकी दिली.
--------------------------
दुर्मीळ इंजेक्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक
रावेत : दुर्मीळ आजारावरील इंजेक्शन अमेरिकेतून आयात करून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीला दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 25 ऑगस्ट 2021 ते 3 सप्टेंबर 2021 या कालावधीत रावेत येथे घडला.
या प्रकरणी अमित शांतारामजी रामटेककर (वय 34, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून एस लक्ष्मी कंथन (रा. कोईम्बतूर, तामिळनाडू) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीच्या मुलाला पायनल मस्क्युलर ऍट्रोफी टाईप 1 नावाचा आजार आहे.
या आजारावर नोव्हार्टिस या कंपनीचे जोलजेंस्मा नावाचे इंजेक्शन अमेरिकेतून आणून देतो असे सांगून आरोपीने फिर्यादीकडून दीडकोटी रुपये घेतले. मात्र, ते कंपनीला पाठवलेच नाहीत. फिर्यादीने रक्कम परत मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर फोन बंद केला.
----------------------------
केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या जवानाची आत्महत्या
तळेगाव दाभाडे : येथील केंद्रीय राखीव पोलीस सुरक्षा बलाच्या छावणीमध्ये सोमवारी सकाळी दहाच्या दरम्यान एका जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अमरीश कुमार गिरी वय 30 वर्षे असे मृत जवानाचे नाव आहे. तो मूळचा मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील राहणारा असून महिनाभर सुट्टीसाठी तो गावी गेला होता. दोनच दिवसांपूर्वी सुट्टी संपल्यानंतर तो कामावर हजर झाला होता. सकाळी तो कामावर रुजू होण्यासाठी कार्यालयात गेला. त्यानंतर त्याचा मृतदेह गच्चीवर गळफास घेतल्याच्या अवस्थेत सापडला. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.
-----
दोघांवर कोयत्याने हल्ला करून रक्कम लुटली
पिंपरी : आंबेडकर चौक, पिंपरी येथे सोमवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास दोघा पादचार्यांवर दोन अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने वार करून त्यांच्याकडील 28 हजार 300 रुपयांची रोख रक्कम लुटून नेली.
याप्रकरणी शबुद्दीन सैफुद्दीन शेख (वय 30, रा. शास्त्रीनगर, पिंपरी, मूळ झारखंड) याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून दोन अनोळखी लुटारूंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आणि त्याचा चुलता सोमवारी रात्री आंबेडकर चौक येथून शास्त्रीनगरकडे पायी जात होते. थिसेनकृप कंपनी समोर ते आले असता तेथे दोघेजण आले त्यांनी कोयत्याचा वार करून फिर्यादीच्या खिशातून रोख रक्कम काढून घेतली.
----------
कोयत्याने वार करून सुरक्षारक्षकाला ठार मारण्याचा प्रयत्न
चर्होेली : चर्होेलीतील एका सोसायटीत काम करणार्या सुरक्षारक्षकांना किरकोळ कारणावरून कोयत्याने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न मंगळवारी मध्यरात्री काही व्यक्तींनी केला.
या प्रकरणी परमेश्वर शिवदास भोसरीकर (वय 30, लोहगाव) याने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आकाश शर्मा (वय 24) आणि त्याचे दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि त्याचा सहकारी चर्होेलीतील लाँगआयलँड सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. ते काम करत असताना मंगळवारी मध्यरात्री आरोपी दुचाकीवरून तेथे आले. सोसायटीचे फाटक बंद असताना ते तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी फिर्यादीने त्यांना बाहेर काढले. याचा राग आल्यामुळे आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या सहकार्याला कोयत्याने व हाताने मारहाण केली. आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
-------
महाविद्यालयीन तरुणीचा अपघाती मृत्यू
पिंपरी : मारुंजी रस्त्यावरील मुरकुटे वस्ती येथे बुधवारी सकाळी नऊच्या दरम्यान कॉलेजला चाललेल्या एका विद्यार्थिनीच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिली या अपघातात टेम्पोचे चाक अंगावरून गेल्यामुळे त्या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला.
धनश्री भगवान राजेकर (वय 17, मुकाईनगर, हिंजवडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे .ती अलार्ड पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होती. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक निंबा मुरलीधर गोसावी (वय 33, रा. नाशिक) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
----------
पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या
मोशी: गंधर्व नगरी तापकीर नगर मोशी येथे बुधवारी सकाळी एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केली.
हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला.
शांताबाई शिवराय अहिवले (वय 52) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शिवराय तुकाराम अहिवले (वय 60) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
ही घटना या दांपत्याचा मुलगा घरी आल्यानंतर दुपारी उघडकीस आली, मृत शिवराय याने प्रथम आपल्या पत्नीचा दोरीने गळा आवळून त्यानंतर तिच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून केला आणि नंतर स्वतः पंख्याला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.
-----------------------------
खुनी हल्ला करणारा अटकेत
वाकड : काळेवाडी, पिंपरी येथे आपल्या मेहुण्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दिली आहे. त्यावरून सचिन आतकरे, (वय 30 वर्षे, रा. मु.पो. सारणी सांगवी तालुका केज, जिल्हा बीड) याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीचा आरोपी जावई आहे. त्याची पत्नी फिर्यादीच्या सांगण्यामुळे आपणाबरोबर नांदत नाही असा आरोपीला संशय होता. फिर्यादीच्या मुलाने आरोपीवर गाडी जाळल्याची केस केली आहे. ती तो मागे घेत नाही याचाही राग आरोपीला होता. त्यामुळे आरोपीने 20 सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास काळेवाडी, पिंपरी येथील शंभूराज कॉलनी येथे असलेल्या 100 खोल्यांच्या चाळीसमोरील रस्त्यावर फिर्यादीच्या मुलाला गाठून कटरच्या सहाय्याने त्याच्या गळ्यावर वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
------------
संकलित गुन्हे वृत्त दि.22 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२२ ०४:५६:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: