आभासीचलनाच्या व्यवहारात चार लाखांचा गंडा
पिंपरी : मोरवाडी रोड, पिंपरी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला आभासीचलन खरेदी करावयास लावून त्याला चार लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 6 ते 14 मार्च या कालावधीत घडला.
या प्रकरणी विजयकोदंडारामन स्वामिनाथन (वय 64, रा. मोरवाडी रोड, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून 85256047752, 81066450908, 7780946191 या मोबाईल क्रमांकधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीला युएसडीटी हे आभासीचलन खरेदी करण्यास सांगितले. मात्र त्याचे पैसे न देता फिर्यादीला चार लाख रुपयाना फसविले.
एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. त्याने फिर्यादीला एक अॅप डाउनलोड करून त्यावर रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. त्यानंतर त्यावरून युएसडीटी खरेदी करण्यास सांगून ते एका संकेतस्थळावर पाठवावयास लावले.
--------------------------------
रहाटणी येथे तरुणास बेदम मारहाण
वाकड : शिवराज नगर, रहाटणी येथे रविवारी रात्री एकाने एका तरुणास बेदम मारहाण केली. मारहाण करणार्याच्या प्रेमप्रकरणाबाबत त्याच्या प्रेयसीच्या घरी सांगितल्याच्या संशयावरून त्याने त्या तरुणाला मारहाण केली असल्याचे समजते.
याप्रकरणी अतुल उल्हास आढाव (वय 26, रा. रहाटणी) याने मंगळवारी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून आदित्य अशोक उतकर (वय 20, रा. रहाटणी) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आदित्यचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याबाबत तरुणीच्या घरी याबाबत समजले. फिर्यादीने ही गोष्ट प्रेयसीच्या घरी सांगितल्याचा आदित्यला संशय होता. त्यावरुन त्याने फिर्यादीसोबत वारंवार वाद घातला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी शिवराज नगर येथे चिकन आणण्यासाठी गेला असता आरोपीने त्याला अडवले आणि लोखंडी सळी त्याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले.
-------------------------------
आचार्याने केली हॉटेल मालकाला मारहाण
हिंजवडी : हिंजवडी फेज-2 येथील एका हॉटेल मालकाला तेथे काम करणार्या आचार्याने मारहाण केली. हा प्रकार येथील सॉलीटरी हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजता घडला. आचार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी क्रिशांत राजीव अगरवाल (वय 30 रा. हिंजवडी) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यावरून गौरहरी गिरीधारी मंडल (वय 30 रा.मूळ कोलकाता) याला अटक केली आहे.
हॉटेलच्या फ्रीजमध्ये सडलेला कोबी ठेवलेला पाहून फिर्यादीच्या आईने आरोपीला का फेकला नाही, असे विचारले असता आरोपीने हॉटेल मालक क्रिशांत याची कॉलर पकडून माझा पगार आत्ताच्या आत्ता द्या. पगार दिला नाही तर मी तुमचा खून करीन अशी धमकी देत फिर्यादीचा गळा दाबला. यावेळी हॉटेल मॅनेजरने मध्यस्थी करून भांडण सोडवले. यावेळी फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी त्यांच्या अंगावरही काठी घेऊन धावून गेला.
-----------------------------
नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक
चिखली : भूसंपादन खात्यात कामाला लावण्याचे आमिष दाखवून एकाने चिखलीतील एका तरुणाला दीडलाख रुपयांना फसविले. हा प्रकार जुलै 2020 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत चिखली आणि वाकड येथे घडला.
या प्रकरणी अभिजित सोमनाथ शिंदे (वय 31, रा. नेवाळे वस्ती, चिखली) याने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अमोल शहाजी पाटील (रा. उस्मानाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने फिर्यादीला आपण मंत्रालयात कामाला असून तुम्हाला भूसंपादन खात्यात नोकरीस लावतो असे फिर्यादीला सांगितले. नोकरी लावण्यासाठी फिर्यादीकडून वेळोवेळी दीड लाख रुपये घेतले.आणि नोकरी न लावता त्याची फसवणूक केली.
---------------------------------------
जागा विकसकाने मालकाला फसविले
चिंचवडगाव : तालेरानगर, चिंचवडगाव येथे एका जागा विकसकाने जागामालकाला 33 लाख रुपयांना फसविले. हा प्रकार 11 ऑक्टोबर 2015 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला.
या प्रकरणी रमाकांत गोपाळ आसलकर (वय 73, रा. तालेरानगर, चिंचवडगाव) याने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आर.के. डेव्हलपर्स तर्फे पंकज काशिनाथ पाटील (वय 31, रा. पिंपळे निलख. मूळ रा. नंदुरबार) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांनी मिळून त्यांची चिंचवड येथील जागा आरोपीला विकसनकरार आणि कुलमुखत्यारपत्र करून बांधकामासाठी दिली.आरोपीने ते बांधकाम पूर्ण न करता फिर्यादींच्या वाट्यास येणारा बांधकामाचा हिस्सा परस्पर विकला. फिर्यादीला रावेत येथे सदनिका देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून 33 लाख रुपये घेऊन फसवणूक केली.
------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.28 सप्टेंबर 2022
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२२ ०३:०९:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: