Police e news

संकलित गुन्हे वृत्त दि.१७ सप्टेंबर २०२२

गांजा विकणार्‍या महिलेस अटक भोसरी : बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी एमआयडीसी येथे शुक्रवारी (दि.16) दुपारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विकणार्‍या महिलेला अटक केली. सहायक पोलीस फौजदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बालाजीनगर झोपडपट्टी येथे एक महिला गांजा विकत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास त्या महिलेला ताब्यात घेतले.तिच्याकडे 21 हजार 375 रुपये किमतीचा 855 ग्रॅम गांजा आढळून आला. हा गांजा तिने आनंद उर्फ आप्पा काळे (रा. परंडा रोड, कुर्डूवाडी, जि. सोलापूर) याच्याकडून आणला असल्याचे निष्पन्न झाले आहे. -------------------- लेखापरीक्षकास लाच घेताना अटक आळंदी : ग्रामपंचायतीच्या दप्‍तरातील आर्थिक अनियमितता लेखापरीक्षणातून वगळण्यासाठी लाच मागणार्‍या लेखापरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने आळंदी येथे अटक केली. महेश एकनाथ म्हात्रे (वय 42, रा. पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या सहायक लेखा परीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ परशुराम जगदाळे (वय 55, रा. राजगुरूनगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने फिर्यादी काम करत असलेल्या ग्रामपंचायतीच्या दप्तरातील अनियमितता लेखापरीक्षण अहवालात न दाखविण्यासाठी आणि वसुली अहवाल न पाठविण्यासाठी फिर्यादीकडे 30 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी पीसीएस चौक, आळंदी येथे सापळा लावून आरोपीला अटक केली आहे.ही कारवाई गुरुवारी (दि. 15) सायंकाळी सहा ते शुक्रवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाच या दरम्यान करण्यात आली. ------------------------ मामांनी बेदम मारहाण करून भाच्याचा पाय मोडला भोसरी : केळगाव आणि भोसरी येथे बुधवारी सकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीच्या मामांनीच अन्य व्यक्तींना त्याचे अपहरण करावयास लावून त्याला काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी मारझोड झालेल्या व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यावरून दत्तात्रय तुकाराम ढेरंगे, अशोक रंभाजी ढेरंगे (रा. गुळाणी, ता. खेड) आणि त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी बुधवारी सकाळी साडेसात वाजता केळगाव येथील सिद्धबेटाजवळ इंद्रायणी नदीच्या पुलावर आला असता पाच अनोळखी व्यक्तींनी त्याला जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण केले. आणि भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या मागे मोकळ्या मैदानात बसवून ठेवले. अपहरण करणार्‍या आरोपींनी फिर्यादीचा मामा दत्तात्रय ढेरंगे याला फोन केला. तासाभराने फिर्यादीचा मामा दत्तात्रय ढेरंगे आणि चुलत मामा अशोक ढेरंगे असे दोघे तिथे आले. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तुझ्या बापाला लै माज आलाय का, तो दुसरे लग्न कसे करतो तेच आम्ही बघतो अशी दमदाटी करत काठीने फिर्यादीला बेदम मारहाण केली. यात फिर्यादीचा पाय मोडला. --------------------- निवृत्त पोलिसाची फसवणूक चिखली : शरदनगर, चिखली येथे एका निवृत्त पोलिसाला त्याच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी 2 लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 16 सप्टेंबर 2022 या कालावधीत घडला. भगवान गेनू म्हस्के (वय 57, रा. शरदनगर, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून संजय धोंडिबा पवार, ठकसेन धोंडिबा पवार (दोघे रा. जेऊर, ता. पुरंदर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचा मुलगा नोकरीच्या शोधात असताना त्याची आरोपींशी ओळख झाली. आरोपींपैकी संजय पवार याची पश्चिम महाराष्ट्रातील एमआयडीसीच्या अधिकार्‍यांसोबत ओळख आहे. त्याने बर्‍याच मुलांना नोकरीला लावले आहे. असे सांगून नोकरीला लावण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रुपये आम्ही घेतो, तुम्ही ओळखीचे असल्याने तुमच्या मुलाचे दोन लाख रुपयात नोकरीचे काम करून देतो, असे आरोपींनी फिर्यादीला सांगितले. फिर्यादीने आरोपींच्या खात्यात 2 लाख रुपये जमाकेले. मात्र, आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावली नाही. ------------------------ वल्लभनगर येथे तरुणाला लुटले पिंपरी : वल्लभनगर, पिंपरी येथे गुरुवारी रात्री 11 ते 12 च्या दरम्यान एका पादचारी तरुणाचे दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी अपहरण करून त्याला मारहाण केली आणि त्याच्या गुगल पे खात्यावरून पैसे काढून घेतले. या प्रकरणी सुयश प्रमोद पाटील (वय 21 रा.पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली.जीवे मारण्याची धमकी देत दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याचा मोबाईल काढून घेऊन गुगल पे द्वारे पैसे काढून घेतले. ---------------------------- तरुणीवर अत्याचार सांगवी : सांगवी येथील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आणि दुसर्‍या व्यकीसोबत लग्न करण्यास विरोध केला. या प्रकरणी त्या तरुणीने सांगवी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून प्रदिप केशव गित्ते (रा.बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला.तिला दुसर्‍यासोबत लग्नही करु दिले नाही. ------------------------------------
संकलित गुन्हे वृत्त दि.१७ सप्टेंबर २०२२ संकलित गुन्हे वृत्त दि.१७ सप्टेंबर २०२२ Reviewed by ANN news network on ९/१७/२०२२ ०९:४८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.