आकुर्डी : आकुर्डीतील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये पेट्रोलपंपावरील रकमेचा भरणा करण्यासाठी आलेल्या कर्मचा-याकडून रक्कम लुटण्यासाठी आलेल्या एका सशस्त्र दरोडेखोर टोळीला नागरिकांच्या मदतीने जेरबंद करण्यात महिला पोलिस सरस्वती काळे यांनी यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांना दहा हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी आकुर्डी येथील हिंदुस्तान पेट्रोलियम (एच.पी) पेट्रोलपंपावरील कर्मचारी अमोल राजाभाऊ चौधरी हे दोन दिवसात पेट्रोल पंपावर जमा झालेले १२ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी दुपारी सव्वाच्या सुमारास आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आले होते. त्यावेळेस बँकेच्या पाय-या चढत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, त्याचवेळी जवळच उभ्या असलेल्या महिला पोलीस सरस्वती काळे यांनी त्याला नागरिकांच्या मदतीने पकडून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे १ पिस्तूल व ४ जीवंत राऊंड मिळून सापडले.
या घटनेची निगडी पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पकडलेल्या दरोडेखोराकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव प्रमोद नामदेव चांद्णे असल्याचे सांगितले तसेच त्याचे दोन साथीदार जयदीप मधुकर चव्हाण व संतोष अभिमान चोथवे दोघेही राहणार मोरेवस्ती, हे सर्वजण आकुर्डी येथील बँक ऑफ महाराष्ट्रजवळ दरोडा घालण्याच्या उद्देशाने हत्यारासह आले असल्याची कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ३९३, आर्म अॅक्ट ३ (२५) सह म.पो.का.कलम १३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
महिला पोलीस सरस्वती काळे यांनी केलेल्या धाडसी कामगिरीमुळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी त्यांना १० हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले आहे.
सशस्त्र दरोडेखोर टोळी जेरबंद!; महिला पोलिसाची धाडसी कामगिरी (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
९/२६/२०२२ ११:३३:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: