पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी गोकी स्मार्ट बँन्ड कंपनीने घेतलेल्या फिटनेस चॅलेंज स्पर्धेतील विजेत्यांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी बक्षीस वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालय, निगडी येथे झाला.
ही स्पर्धा दिनांक 26 फेब्रुवारी 2022 ते 27 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये घेण्यात आली. 1 हजार किलोमीटर सायकल चालविणे आणि 300 किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरुप होते.
या स्पर्धेमध्ये 2 हजार 194 पोलीस अधिकारी व अंमलदारांनी भाग घेतला. त्यापैकी 94 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. 44 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1 हजार किलोमीटर सायकल चालवून स्पर्धा पूर्ण केली. तर, 50 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 300 किलोमीटर धावून स्पर्धा पूर्ण केली. सर्व विजेत्यांना स्मार्ट गिअर सायकल बक्षिस म्हणून देण्यात आली.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त शिंदे यांनी माजी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून गोकी स्मार्ट बँन्ड या कंपनीचे आभार मानले. तसेच पोलीस अधिकारी व अमंलदार हे फ्रंट वॉरिअरच्या भूमिकेत असल्यामुळे त्यांनी स्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्यावे असे मार्गदर्शन करून सर्व विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेतील विजेते स्पर्धक पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गुमाने, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती लामखेडे , महिला पोलीस हवालदार सुरेखा देशमुख, व पोलीस अंमलदार विनायक विधाते यांनी अशी स्पर्धा घेऊन सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पोलीस आयुक्तालयाचे आभार मानले.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी रावसाहेब जाधव तसेच गोकी फिटनेस चॅलेंज स्पर्धेचे एकूण 94 विजेते पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
‘गोकी फिटनेस चॅलेंज’ स्पर्धेतील विजेत्यांना पोलिस आयुक्तांच्या हस्ते बक्षिस वितरण
Reviewed by ANN news network
on
९/२४/२०२२ ०२:११:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: