महिलेची बदनामी करणार्यावर गुन्हा दाखल
वाकड : महिलेची बदनामी करून तिला नोकरीवरून काढून टाका असे सांगणार्याविरोधात त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलगुन्हा दाखल झाला आहे.
तुषार वर्मा (वय अंदाजे 35 रा.वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.त्याने त्या महिलेचा पाठलाग करून ती काम करत असलेल्या दुकानाच्या मालकांकडे तिची बदनामी केली. आणि तिला कामावरून काढून टाका असे सांगितले. हा प्रकार जून महिन्यापासून सुरु होता.
फिर्यादीने त्याच्या त्रासाला कंटाळून काम सोडले. पुढे ती दुसर्या एका ठिकाणी काम करत असताना त्याने त्याही दुकानाच्या मालकाला व्हॉटसअपवरून कॉल करून फिर्यादीची बदनामी करून तिला कामावरून काढून टाकण्यास सांगितले.
--------------------------------
वेश्याव्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर छापा
चर्होली : चर्होली खुर्द येथील एका लॉजवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा घातला.
याप्रकरणी जितेंद्र सुनील चौधरी (वय 24, रा. भोसरी), महिला (वय 34, रा. भोसरी) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हे दोघे एका 28 वर्षीय महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा घालून तसेच दोघांना अटक करून त्यांच्याकडून 79 हजार 530 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
-----------------------------------
सुरक्षारक्षकाने चोरट्यास पकडले
हिंजवडी : हिंजवडी येथे गुरुवारी रात्री बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ठेवलेले साहित्य चोरणार्यास सुरक्षारक्षकाने पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी सुरक्षारक्षक ऋषिकेश आरबाड (वय 20, रा. माणगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संतोष सतीश गायकवाड (वय 24, रा. वाकड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हिंजवडी येथील अग्निशमन केंद्राच्या समोरील बाजूस असलेल्या एका बांधकाम स्थळावर फिर्यादी सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. तेथून आरोपी संतोष गायकवाड प्लेट घेऊन जात असताना आढळला. फिर्यादीने त्याला अडवून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाऊ लागला त्यामुळे फिर्यादीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
------------------------------
कामगाराने केली कारखान्यात चोरी
भोसरी : एमआयडीसी भोसरी येथे कंपनीत काम करणार्या कामगारानेच कंपनीत असलेली दुसर्या कंपनीच्या मालकीची सुमारे 34 हजार रुपयांची तांब्याची व अॅल्युमिनियमची तार चोरून नेली.
या प्रकरणी तीर्थ राजसिताराम यादव (वय 49 रा.भोसरी) याने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून सुनील जयभगवान चव्हाण (रा. पिंपरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.े. हा प्रकार शुक्रवारी (दि.30) सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आला.
फिर्यादीच्या कंपनीत आरोपी साफसफाई करत होता. त्याने कंपनीच्या शेडचे काम करणार्या आर.बी.टेक्नोक्रस्ट कंपनीची 33 हजार 80 रुपयांची तांबे व अॅल्युमिनियमची तार चोरली.
--------------------------------
उत्तम परताव्याच्या आमिषाने 13 लाखांचा गंडा
निगडी : निगडी परिसरातील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळेल आमिष दाखवून एकाने 13 लाख 13 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
या प्रकरणी बबन चंदर खोडवे (वय 64, रा. संभाजीनगर चिंचवड) याने निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार दिली. त्यावरून रवी गवळी (रा. चिंचपोकळी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 10 जून 2020 ते 29 ऑगस्ट 2020 या कालावधीत निगडी परिसरात घडला.
आरोपी हा फिर्यादीच्या सोसायटीमध्ये राहणार्या व्यक्तीच्या ओळखीचा आहे. त्याने फिर्यादीला भेटून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. पैसे गुंतवल्यास त्याचा परतावा देतो, असे आश्वासन त्याने दिले.
फिर्यादीने आरोपीकडे 15 लाख रुपये दिले. त्यातील 13 लाख 13 हजार रुपये रवी याने स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फिर्यादीची फसवणूक केली.
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: